top of page

परिचय 

|| जयतु हिंदुराष्ट्रम ||

सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे

परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे

            या  समर्थ रामदास स्वामींच्या वचनानुसार मार्गक्रमण करीत श्रीशिवछत्रपती आयुष्यभर झुंजले, झगडले. मारू घातलेल्या हिंदू समाजामध्ये सत्व स्वाभिमान, स्वधर्म, स्वराज्य ह्या विषयी जाणीव निर्माण करून हिंदू या देशाचा राजा सम्राट होऊ शकतो, याची शाश्वती महाराजांनी तीन तापाच्या हलकल्लोळानंतर समाजाला आणून दिली. तत्पूर्वीच हिंदू समाज आपापसातील तंटे, हेवेदावे, भांडणे यात गुरफटून गेला होता. परकियांचीच गुलामगिरी पिढ्यानपिढ्या करण्यात धन्यता मानणारा मरणासन्न हिंदू समाज फक्त देहाने जिवंत होता. कृतीने तो कधीच मरण पावला होता. शिवरायांच्या रूपाने हिंदू समाजाचे शतकानुशतकांचे पुण्य फळाला आले. स्वभाषा, स्वदेश, स्वधर्म या संकल्पना कत्तल झालेल्या शरीरासारख्या चौफेर विखुरल्या होत्या. महाराजांनी राष्ट्राचे ते अवयव सांधले. त्या मेलेल्या संकल्पनेत प्राण भरले आणि संकलित हिंदुराष्ट्राचा आराखडा महाराष्ट्राच्या रूपाने देशासमोर ठेवला. होय, हेच ते रामराज्य म्हणजेच शिवराज्य. महारुद्र हनुमंताला जशी दुर्वास ऋषींच्या शापाने स्वतःच्या ताकतीचा जाणीव व्हायची नाही, ती कोणीतरी करून द्यावी लागत असे, त्यातूनच कोटींच्या कोटी उड्डाणे होत आणि रावणासारखी मदांध सत्ता जाळून नष्ट होई. शिवपूर्वकाळात हिंदुसमाजाची अवस्था अगदी अशीच झाली होती. यातून महाराष्ट्राला जागं करण्याचं काम महाराजांनी केले. विश्वकर्म्याला आव्हान देणाऱ्या विश्वामित्रासारखी केवळ नावानेच शिल्लक असणाऱ्या हिंदूंच्या देशात हिंदवी स्वराज्याच्या रूपाने आदर्श राज्याची स्थापना केली.

          महाराजांचा हा सर्व खटाटोप आजच्या काळात अति अति गरजेचा होऊन बसलाय. स्वत्व स्वाभिमान नसल्याने भेकाडांच्या पुढेही आपण गुडघे टेकायला मागे पुढे पाहत नाही. नितीमत्ता विसरल्याने भ्रष्टाचार, शिष्टाचार झालाय. तरुण पिढी व्यसनाधीन झालीय. व्यभिचार, चैन, मौजमजा यात गुंतलेला हिंदू तरुण पहिला कि वाटतं खरंच हे महाराजांचे वंशज असतील. खरंच यांच्या धमन्यांमधून शिवरायांचे व मावळ्यांचे रक्त सळसळत असेल. गडांवर पुत्रवत प्रेम करणारे महाराज, गडावरील पार्ट्या  पाहून काय म्हणत असतील ? या सर्व गोष्टींची जाणीव व्हायची असेल तर शिवरायांची सलगी होणे आवश्यक आहे. याचसाठी आज या हिंदू समाजाला पुन्हा एकदा त्याच्या ताकतीचा जाणीव करून देण्यासाठी आदरणीय भिडे गुरुजींच्या सारखा चळवळीचं सामर्थ्य पटवून देणारा 'रामदास' उभा ठाकलाय. सर्वस्वाचा त्याग करून, व्रतस्थ राहून गुरुजी हिंदू तरुणांमध्ये शिवाजी संभाजी या राष्ट्रतारक मंत्रांची लागण व्हावी यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. दिव्यासारखे जळत आहेत आणि चंदनासारखे झिजत आहेत. रसायनशास्त्रात सुवर्णपदक विजेते असणारे गुरुजी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते. शिवरायांच्या अर्धवट राहिलेल्या कार्याची जाणीव करून देण्यासाठी गेली ३५ वर्षे विविध कार्यक्रम आणि उपक्रमातून गुरुजी तरुणांना मार्गदर्शन करतात. १९८४ साली स्थापन केलेल्या 'श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान' रुपी रोपट्याचे रूपांतर आज सकल हिंदूंना आधार देणाऱ्या वटवृक्षामध्ये झाली आहे. आज महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येने श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी भारतमातेच्या जीवनवाहिनीचे शिवाजी संभाजीरूपी ठोके जिवंत ठेवण्यासाठी, सर्व इर्षेना पायदळी तुडवून काम करतात.

          संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात "धर्माचे पालन करणे पाखंड खंडन" "धर्मरक्षवायसाठी करणे आता आम्हांसी" अगदी याच मार्गाने श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी धर्म रक्षणासाठी, गुरुजींनी घालून दिलेल्या अति स्वतःवर लावून घेऊन पाखंडांचे खंडन करण्यासाठी अहोरात्र झटतात. शिवरायांच्या जीवित कार्याची, त्यांच्या धकाधकीच्या आयुष्याची ओळख व्हावी, त्यांची रणनीती समजावी यासाठी धारातीर्थयात्रा मोहीम आखल्या जातात. गुरुजींच्या मते महाराजांचा प्रत्येक गड 'श्रीशिवाजी विद्यापीठ' आहे. इथली धूळ मस्तकी लावणाऱ्यांमध्ये देशद्रोह्यांना धूळ चारण्याची ताकत निर्माण होते यात संशय नाही. गडकोटांवरील मातीत देहू आळंदी पंढरपूरच्या मातीची पुण्याई आहे, असा सर्व धारकर्यांना विश्वास आहे.  याशिवाय प्रतीष्ठानकडून संपूर्ण फाल्गुन मास धर्मवीर संभाजीमहाराज बलिदान मास म्हणून पळाला जातो. आजच्या हिंदूंचे हिंदूपण केवळ धर्मवीरांचे बलिदान या आणि याच घटनेमुळे शिल्लक आहे. हिंदुस्थानची शांती भंग करणाऱ्या इस्लामी संकटांची अंत्ययात्रा काढण्याची ताकत जोपर्यंत हिंदूंमध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत श्रीशिवप्रतिष्ठानच धारकरी धर्मवीर ज्वालेपुढे प्रतिज्ञा घेऊन संभाजी महाराजांना आदरांजली वाहणारच. त्याचबरोबर हिंदुराष्ट्र देवो भवः व्रत, श्रीदुर्गामाता दौड, श्रीशिवराज्याभिषेक दिन, इतिहास अभ्यास परिषद, शिवचरित्र पारायण, विवेक सभा, नरवीरांच्या पुण्यतिथी, या कार्यक्रमांद्वारे हिंदू तरुण शिवरायांसारखाच देशभक्त, धर्मभक्त आणि निर्भीड, निर्व्यसनी, निष्कलंक घडविण्यासाठी  तरुणांच्यात तशी जाणीव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात.

          असे अनेक कार्यक्रम आणि उपक्रम त्याचबरोबर व्रताचे आचार पाळून धारकरी हिंदुराष्ट्राच्या उभारणीचा मार्ग आपापल्या कार्यक्षेत्रात राहून सुखकर करीत आहेत. धर्मासाठी झुंजणाऱ्या या धारकर्यांना पाहून शिवरायांचे रूप आठवते. देशद्रोही शत्रू बडवून बुडवून धर्मसंस्थापना करणारे महाराज आज आम्हा श्रीशिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांचे, बहुत जनांचे आधार आहेत. मार्गदर्शक आहेत. भारतमातेच्या कपाळावरचे हिंदुत्वाचे सौभाग्यतिलक अक्षय टिकवण्यासाठी हिंदुसमाजाची तरुण पिढी शिवाजी संभाजी महाराजांच्या रक्त गटाची बनविणे हेच श्रीशिवप्रतिष्ठानचे ध्येय आहे. या शिवाजी संभाजी मार्गाने चालणाऱ्या प्रत्येक धारकार्याची अंतर्बाह्य शत्रू निर्दाळणन्याची आणि जगत्जननी भारत मातेच्या संरक्षणाची प्रतिज्ञा हीच या देशाला 'आनंदवनभुवन' बनवेल. हीच श्रीशिवप्रतिष्ठानची, हिंदुस्थानची तळमळ आहे.

                                                                                                                                        www.shrishivpratishtha.com

bottom of page