top of page

अभिषेक मंत्र

 

कित्येक दिप विझले जरी या जगांत ।

तळपे कधी न विझता रवी या नभांत ।।

निर्मु असंख्य हृदयी शिवसूर्यज्वाला ।

सर्वस्व देतील स्वयें क्षणी मायभूला ।।१।।

 

माघार ठावी न कधी आम्ही मातृभक्त ।
राष्ट्रार्थ जीवन जगुं शतधा विरक्त ।।

चित्तांत साठवू सदा शिवभूपतीस ।

काळास जिंकिल असा घडवू स्वदेश ।।२।।

 

रक्तांत बिंबवू उठा अरिसूडत्वेष ।

त्या वाचुनी न टिकतो कधी हि स्वदेश ।।

जाळु गलिच्छ क्लिबवत अवघे विटाळ ।

राष्ट्रात निर्मु अवघ्या शिवसूर्यजाळ ।।३।।

 

इतिहास गर्जुनी आम्हा कटू सत्य सांगे ।

ठेचु शकला यवना जरी व्हाल जागे ।।

संपूर्ण नाश अरीचा जरि ना कराल ।

विश्वात राष्ट्र म्हणुनी कधी ना टिकाल ।।४।।

 

शिवबा कशास्तव कसें जगले स्मरुया ।

शिवभूपमार्ग विजयार्थ उठा धरु या ।।

मनिषा अपूर्ण परिपूर्ण करावयास ।

विजयी रणात करु या भगव्या ध्वजास ।।५।।

 

राष्ट्रार्थ जीवन जगुं प्रण हा अभंग ।

आपत्ती दुःख भवती असता अथांग ।।

सर्वस्व अपर्ण करू आम्ही मायभूस ।

निर्माल्य जीवन बनो उरी तीव्र ध्यास ।।६।।

 

आकाशी सूर्य म्हणुनी ऋतुचक्र चाले ।

पाण्यामुळे जगतीं मत्स्य जिवंत ठेले ।।

देहात प्राण म्हणुनी आम्ही जीवमान ।

शिवसूर्य चित्ती धरूनी बनू राष्ट्रवान ।।७।।

 

राष्ट्रार्थ हाती धरणे ''शिवखड्गधारा" ।

पाळे मुळे समुळही जाळूनी शत्रू मारा ।।

वधण्या अभंग धृतीने रणीं म्लेंच्छदैत्य ।

सिंहासमान जगलें शिवसूर्य नित्य  ।।८।।

भगवा करांत धरिला कधींही न सोडू ।

हिन्दुत्वशत्रु सगळे हुडकुनी गाडू ।।

शिवसूर्य ध्येय आमुच्या नित काळजात ।

रणकंदणी फडकवू भगवा जगांत ।।९।।

 

दीपात तेल नसता न पडे प्रकाश ।

निष्ठा विना न तगडां बनतो स्वदेश ।।

हिन्दुसमाज मतीं हृद करण्या स्वतंत्र ।

शिवबा विना न दुसरा बलशाली मंत्र ।।१०।।

 

हिन्दूत चेतवू उठा शिवसूर्यजाळ ।

जो जाळ जाळील पूरे अरिम्लेंच्छकुळ ।।

ह्या लक्षपूर्ती स्तवही जगणे जयांचे ।

हे राष्ट्र निर्मु असल्या "शिवशार्दुलांचे" ।।११।।

 

संभाजीमंत्र तदवत् उरी ज्या शिवाजी ।

मारेल मृत्यूवरही रणीं नित्य बाजी ।।

हे हिन्दुराष्ट्र करण्या रवीवत् ज्वलंत ।

हे बीज मंत्र भिनवू मनशोणितात ।।१२।।

 

निष्ठा अभंग उरी ठेऊनी मार्ग चाला ।
आव्हान देऊनी उठा नित संकटाला ।।
आशिष देईल तुम्हा तुळजाभवानी ।
जिंका आदेश दिधला शिवभूपतींनी ।।१३।।

 

देहास मानूनी जगा नित पायपोस ।
झुंजा अखंड करण्या आपुला स्वदेश ।।

होऊ नका चूकूर हो हृद्गत कथूनी  ।

संदेश अंतिम दिला शिवभूपतींनी ।।१४।।

 

कशासाठी आणि जगावें कसे मी ।
विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी ।।
जगू पांग फेडावया मायभूचे ।
आम्ही मार्ग चालू जिजाऊसुताचे ।।१५।।

  • w-facebook
  • Twitter Clean
  • w-flickr
bottom of page