।। मर्द आम्ही हिन्दु खरे ।।
मर्द आम्हीच हिन्दु खरे, दुश्मनांना भरे कापरे
देश रक्षावया, धर्म तारावया कोण झुंझात मागें उरे ।।ध्रु।।
भारता आम्ही तुलाच देव मानतो
तूच धर्म तूच मोक्ष एक जाणतो
राखतो महान आमुची परंपरा
रक्त शिंपूनी पवित्र ठेवितो घरा
याच भूमीवरी प्राण गेला तरी
आमुची वीर गाथा उरे ।।१।।
मर्द आम्ही हिन्दु खरे, दुश्मनांना भरे कापरे
देश रक्षावया धर्म तारावया कोण झुंझात मागें उरे ।।ध्रु।।
व्हा पुढें आम्हा धनाजी बाजी सांगती
वीर हो उठा कडाडतात नौबती
राजपूत ना कधी संगरी हटे
मारूनी दहास एक मरहट्टा कटे
सिंधू ओलांडूनी धाविती संगीनी
पाय आतां न मागें फिरे ।।२।।
मर्द आम्ही हिन्दु खरे, दुश्मनांना भरे कापरे
देश रक्षावया धर्म तारावया कोण झुंझात मागें उरे ।।ध्रु।।
वादळापरी आम्ही पुढेच धावतो
जय शिवाजी गर्जुनी रणांत झुंजतो
विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरीं
पुर्वजांपरी अजिंक्य दिव्य संगरीं
घेऊ शत्रूवरीं झेप वाघापरी
मृत्यू आम्हापूढे घाबरे ।।३।।
मर्द आम्ही हिन्दु खरे, दुश्मनांना भरे कापरे
देश रक्षावया धर्म तारावया कोण झुंझात मागें उरे ।।ध्रु।।