पहावें तिथें दंभ चोरी लबाडी ।
दिसें गांव तें वाटतें चोरवाडी ।।
धुंडाळुनी शुद्ध व्यक्ती मिळेना ।
पुरा देश झाला किती हीनवाणा ।।१।।
बघावें तिथें स्नेह करुणा उन्हाळा ।
अनीती फसवणूक पाहवें न डोळा ।।
पशूता किती क्रूर थैमान घाली ।
जनांचा दिसेना कुणी ही न वाली ।।२।।
त्वरें खरकटी बुद्धी घेती दुजांची ।
स्वयें चालती वाट जी परकियांची ।।
नसे चाड कांही स्वत:च्या कुळाची ।
करंटी पिढी जन्मली सूकरांची ।।३।।
आहों कोण याची असें शुन्य जाण ।
नसे स्वत्व वा देशधर्माभिमान ।।
"मरे तो जगूं या" असा हीन भाव ।
अशांची असे माऊली मृत्युदेव ।।४।।
बिरूदावल्या मोठमोठ्या जयांना ।
असे सर्व ज्ञानी फसवती जनांना ।।
नसे कोणी विद्वान हा शीलवंत ।
बका माजी जैसा नसे कोणी संत ।।५।।
सदा बोलती मोठमोठे विचार ।
कधीं ही नसे शोभणारा आचार ।।
भल्यांच्या मतीमाजीं वित्ताभिलाषा
मुखीं कीर्तनें आणि आंतुनीं तमाशा ।।६।।
दिसे तें नकोसे नसे तें हवेसे ।
मनाचे असे नित्य वेडे उसासे ।।
खुळ्या या मनाचा त्वरें नाद सोडा ।
विवेकासवें आप्तसंबंध जोडा ।।७।।
उरीं राष्ट्रनिष्ठा नसे स्वाभिमान ।
अशांचे कसें राष्ट्र होई महान ।।
उठा हिंदुजाती करुं ध्येयनिष्ठ
कराया जगीं हिंदुराष्ट्र बलिष्ठ ।।८।।
वधा आळसाला उठा घाम गाळा ।
सुखासीनता कर्मयोगांत जाळा ।।
विवेकें सदा राबती जें अपार ।
अशांच्या पुढें काळही वाकणार ।।९।।
सरोवरें सदा शोभती अंबुजानें ।
कमळास शोभा हि जलाशयाने ।।
गगनास शोभा रविचंद्र देती ।
भगव्यांमुळे शोभते ही धरित्री ।।१०।।
( अंबुज-कमळ )
करावें स्वयें तें कधीं ना स्मरावें ।
परोपकारार्थ सदा झिजावें ।।
कृतज्ञ होऊनी जगीं जगावें ।
परकृत उपकारा नेहमी आठवावें ।।११।।
मौलिक स्वर्ण असुनी रूची ना सुगंध ।
हत्ती बलिष्ठ असुनी गतिमाजीं मंद ।।
उड्डाणराज गरूडास न हंसज्ञान ।
गुणश्रेष्ठ हिन्दु असुनी जगीं स्थानहीन ।।१२।।
( स्वर्ण-सोने, हंसज्ञान-दूध व पाणी वेगळ करण्याची क्षमता )
नसे जाण त्याला म्हणा प्राणहीन ।
नसे सिंधु तो ज्यास ये ना उधाण ।।
न पांग फेडी म्हणा त्या न सुत ।
करुं हिन्दु सारे जगीं जातीवंत ।।१३।।
जगा सिंह म्हणुनी ,नका होऊ श्वान ।
नसावा कधी हिंदु हा हीन दीन ।।
त्यजावा न केंव्हा स्वदेशाभिमान ।
धरूं या मनीं तीव्र धर्माभिमान ।।१४।।
आशंका मनीं कार्य होई न चोख ।
गती खुंटते जेवी चिखलांत चाक ।।
कशी शिस्त रहावी जिथे नाही धाक ।
जगूं राष्ट्रकार्यी सदा रोखठोक ।।१५।।
निसरड्यावरी पाय केंव्हां न ठेवा ।
तसा चोर हा सोबतिला नसावा ।।
नसावे कधीं इंद्रियांच्या अधीन ।
हवा कार्यकर्ता सदा सावधान ।।१६।।
मुखें बोलती मोठं मोठें विचार ।
कृतिशून्य झाले सुशिक्षित फार ।।
फुले कागदाची जया ना सुवास ।
उभी दावणीला जणूं वांझ म्हैस ।।१७।।
जननी न टाकूं शकते कधीं लेकराला ।
ग्रहमालिका त्यजू शके न कधीं रवीला ।।
सरीता कधीं न बदले उदधी दिशेला
हिंदु न सोडूं शकतो भगव्या ध्वजाला ।।१८।।
जनांच्या मधें स्वत्व ना स्वाभिमान ।
मनानें पुरा देश झाला स्मशान ।।
उठा निर्मूं चित्तीं शिवाजीप्रकाश ।
जयानें जळे दास्यताबंधपाश ।।१९।।
असे जें दिखाऊ नसे ते टिकाऊ ।
नका इंद्रधनुला लढाईस घेऊ ।।
किती तेरड्याची फुले छान दिसती ।
दिसा दो मधें पूर्ण संपून जाती ।।२०।।
असे ज्यास इच्छा मिळे मार्ग त्याला ।
विचारुं नका वाट केंव्हां कुणाला ।।
कसा चालसी तूं ? पुसा आंधळ्याला ।
स्वयें चालता जो पुसेना कुणाला ।।२१।।
चहूं बाजुनी संकटें घेरताती ।
तरी चालती ताठ ठेवुनी छाती ।।
आपत्तीवरी नित्य करितात मात ।
अशांची शिवाजी असे जन्मजात ।।२२।।
मनीं साचतो वासना केर झाडा ।
आंतुनी करा स्वच्छ हा देहवाडा ।।
करा दूर नेहमी सुखासीनतेला ।
तनु सारखें स्नान घाला मनाला ।।२३।।
उरीं देव आहे आम्हां मार्ग दावे ।
तया वाचुनी ना आम्हां अन्य ठावें ।।
स्वत:च्या वरी पूर्ण विश्वास ज्यांचा ।
हरी सहाय्यकर्ता बने नित्य त्यांचा ।।२४।।
समक्षांत बोले स्तुती गोड गोष्टी ।
परोक्षांत चाले मती ऊफराटी ।।
अशापासुनी सावध नित्य राहावें ।
कुणाच्या स्तुतीने कधीं ना भुलावें ।।२५।।
स्वत: खाती मोठ्या सुपाऱ्या त्रिकाळ ।
पुजेसाठीं छोट्या जणूं कीं दुकाळ ।।
अशी देवभक्ती असें माणसांची ।
कुणी जात ही निर्मिली खेकड्यांची ।।२६।।
फुटे पोट इतकी स्वत: केळी खाती ।
परी एक ना गाई वत्सास देती ।।
असें गाय माता मुखें बोलताती ।
तिच्यासाठीं साली अशी हीन रीति ।।२७।।
मुळांचा पसारा जधीं खोल खोल ।
तरुंचा अशा वादळीं राही तोल ।।
जरी तीव्र निष्ठा जनांच्या मनांत ।
टिके राष्ट्र लढतां अरिसंगरांत ।।२८।।
शिवसूर्य चित्तीं आमुच्या तळपे अखंड ।
उध्वस्त नष्ट करुं हें आम्ही म्लेंच्छबंड ।।
हिंदुसमाज घडवूं शतधा ज्वलंत ।
यवनांत पूर्ण करण्या बनूं या कृतांत ।।२९।।
ठगांच्या मुखें जें मिळें ऐकण्यास ।
तयाला असें खूप मोठा समास ।।
नऊ हात ढलपी सहा हात फाळ ।
अशा बोलण्याला नसे ताळ मेळ ।।३०।।
धनाला नका जीवनमध्य मानूं ।
धनाढ्यास वाचें नका व्यर्थ वानूं ।।
जयाला जगीं द्रव्य वाटेल देव ।
उरेना तिथें नीतिचे नांव गांव ।।३१।।
( वानूं (वाखाणणे)-प्रशंसा करणे )
कुठें गाय गेली ? विचारे कसाई ।
तयाला खरें सांगणें पाप होई ।।
जगीं संत रक्षावया सत्य सोडा ।
करावा असा न्यायनीति निवाडा ।।३२।।
जणूं काळ खाण्या आणि भूमिभार ।
अशी माणसें हि किती जन्मणार ।।
मिळावा कसा यातुनी कोणी त्राता ।
अशी मायभूच्या मनीं तीव्र चिंता ।।३३।।
जरी कां कधी रोग रेड्यास झाला ।
पखालीस लावूं नका औषधाला ।।
अहि सोडुनी ना बडविणे बिळाला ।
त्यजा अन्य शत्रूं वधां म्लेंच्छतेला ।।३४।।
( अहि-साप )
त्यजा श्वानवृत्ती बना स्वाभिमानी ।
उठा देश घडवूं स्वत:च्या मतींनी ।।
त्वरे जाळूं या खरकट्या कल्पनांना ।
'नकादर्श' मानूं कधी परकियांना।।३५।।
( नकादर्श - नका +आदर्श )
धरा शत्रूचा राग संताप चीड ।
त्यजूं दास्यता वाळवी क्षुद्र कीड ।।
नको देशदेहावरी शत्रुखुण ।
जनीं निर्मूं या देशधर्माभिमान ।।३६।।
नसे विश्व हे लहान अथवा महान ।
मती येवढें विश्व आकारमान ।।
जयाची जशी बुद्धी चित्अंतरंग ।
तसें भासते विश्व जें कां अथांग ।।३७।।
नसे धार ते खड्ग ही लोहपट्टी ।
विना खोबरे नारळ हि नरोटी ।।
दिशा दृष्टी नाही अशा ह्या जीवांना ।
उगा माणसे कां म्हणावे पशूंना? ।।३८।।
दिसे दर्पणीं तें कधीं ये न हाता ।
जगीं सूख ही पूर्ण फसवी वदंता ।।
दिसे स्वप्नी तें द्रव्य लाभेल काय ।
सुखाच्या स्तवें व्यर्थ हा पाठलाग ।।३९।।
सुखासीनता तेथ राहे न राम ।
वसे राम तेथें जिथें कष्ट घाम ।।
जयांना त्वरें गाठणें ध्येयधाम ।
अशांनी आरामास द्यावा विराम ।।४०।।
त्यजूं मेंढीवत् जें आयु दीर्घकाळ ।
जगूं सिंहवत् हें जिणें अल्पकाळ ।।
नको राख होऊनी जगणें असीम ।
बनूं या तडित् जी उजाळेल व्योम ।।४१।।
( तडित्-वीज, व्योम-अंधार )
झडपे जसा ज्योतीवरती पतंग ।
मनानें असें ना आम्ही होऊं व्यंग ।।
चितेमाजीं काष्ठे जशी भस्म होती ।
विकारासवें आमुची हीच रीती ।।४२।।
नाही मनाहूनि दुजे अति तीक्ष्ण शस्त्र ।
निर्धार युक्त मती हे अति दिव्य अस्त्र ।।
हिंदुमनास चढवूं शिवभूपधार ।
हें हिंदुराष्ट्र घडवूं आम्ही धारदार ।।४३।।
जिथें लाथ मारुं तिथें काढू पाणी ।
असे हिंदू सारे करूं स्वाभिमानी ।।
जिथें जाऊं पाहूं तिथें जिंकू लोक ।
जनांच्या मधे निर्मुं या राष्ट्रभूक ।।४४।।
जिवाच्यासवें मृत्यु हि जन्म घेतो ।
सूर्योदयाच्या सह अस्त येतो ।।
असे ज्यास आदि तया अंत आहे ।
भवाची नदी ही अखंडित वाहे ।।४५।।
नसे शील तो सूकराहून हीन ।
तयाचे असे बोलणें श्वानज्ञान ।।
अशांना कधीं ना जनीं स्थान द्यावें ।
दिवाभीत त्याच्या मुखा ना पहावे ।।४६।।
( सूकर - डुक्कर,दिवाभीत-घुबड )
वरूनीं दिसे तें असे आंत अन्य ।
जणूं साधू भासे परी वृत्ती वन्य ।।
दुरुनी पाहाता जणूं सिंह वाटे ।
जगीं भासते तें असे सर्व खोटे ।।४७।।
नसे दुर्गुणावाचुनी शत्रू कोणी ।
अशी जाण ठेवा स्वतः नित्य ध्यानीं ।।
मिठाचा खडा नासवे सर्व दूध ।
त्वरें दुर्गुणांचा करा लक्ष्यवेध ।।४८।।
मनाच्या रणीं जो पराभूत झाला ।
कधीं ही जयश्री वरें ना तयाला ।।
महावज्र निर्धार ज्यांच्या उरांत ।
यशश्री भरें पाणी त्यांच्या घरांत ।।४९।।
जरी राजसत्ता विरोधांत गेली ।
नका वाकवूं मान केंव्हा ही खाली ।।
जरी कां कधीं अग्नीची भेट होई ।
जळे ना कधीं स्वर्ण उजळून जाई ।।५०।।
धनाचा त्वरें मोह सोडा सवंग ।
धरे तो कुणी शील होईल भंग ।।
नसे शील तो प्राणी मेल्या समान ।
जणूं लूथ भरतां जगे शूद्र श्वान ।।५१।।
मुसळास पालवी कधीं तरी कां फुटेल? ।
झाडावरी न म्हसरुं कधीं हि चढेल ।।
सूर्योदरीं न उपजे हिमशैलखंड ।
प्रेते तसेंच क्लिब ना करतील बंड ।।५२।।
सिंहास कां कुणी कधीं अभिषेक केला ।
तरी हि वनांत मृगराज स्वयंभु ठेला ।।
दुर्दांत दाहक ज्वलंत हरिसमान ।
हे हिन्दुराष्ट्र घडवूं आम्ही युद्धमान ।।५३।।
उजळावयास पुरतो नभीं एक भानु ।
जगतास देऊं शकते पय कामधेनु ।।
आधार कोण जगतीं खलु या धरेस ।
सामर्थ्यवान द्युतिमान हि हिन्दुदेश ।।५४।।
( द्युतिमान-तेजस्वी,पय-दूध )
चिलटास ऊंची न कळे कधीं अंबराची ।
बदकास खोली न कळें कधीं हि तळयाची ।।
अंधास दीप्ती नुमजे जशी भास्कराची ।
महती न षंढ आकळे कधीं हिन्दुतेची ।।५५।।
( नुमजे -न उमजे )
लक्ष्यावरील कधीं चित्त ढळूं न देऊं ।
संकल्पसिद्धिस्तव हि अति शीघ्र धावू ।।
क्षिती ना मनांत अणुमात्र हि आपदांची ।
ही जात कडवी आमुची शिवपाईकांची ।।५६।।
सह्याद्रि सांगत उभा किती काळ झाला ।
शिवभूपस्पर्श घडला इथल्या धुळीला ।।
भाळास लावून उठूं जरी या धुळीस ।।
जिंकाल पूर्ण अवनी वधुनी अरीस ।।५७।।
अंधास जाणिव नसें कधीं दर्पणाची ।
बहिऱ्यास महति न कळे कधीं संगिताची ।।
चिलटे न मारूं शकती कधीं हि भरारी ।
शूरा विना न उमगे जगतीं मुरारी ।।५८।।
वास्तूस काष्ठ उपयुक्त न पोपईचे ।
दीपास इंधन न रुचे कधीं हि जळाचे ।।
भाला कधीं न करणें कधीं नवनीताचा ।
राष्ट्रास तारुं न शके पथ षंढतेचा ।।
हिंदुस तारुं न शके पथ गांधीतेचा ।।५९।।