!! धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज बलिदानास !!
फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन (मृत्युंजय) आमावस्या
शिवछत्रपतींच्या पश्चात त्यांची तीच भवानी तलवार हातात घेऊन आणि तेच आसेतु हिमाचल हिंदवी स्वराज्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी संभाजीमहाराज रणांगणात उतरले. एकाच वेळेस मुघलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, इंग्रज, पोर्तुगीज, हबशी या सर्व शत्रुंना अंगावर घेऊन त्यांच्यापासून स्वराज्याचे आणि रयतेचे रक्षण केले. गोव्यापासून गुजरात पर्यंत, कोकण पासून कांजीवरम पर्यंत आणि व्हराड मध्यप्रदेश पासून आंध्रप्रदेश पर्यंत पाच हजार मैल त्यांची तलवार तळपत होती. हिंदवी स्वराज्यात आणि खजिन्यात दुप्पट वाढ केली. पण शेवटी आपल्याकडच्या फंदफितुरीमुळे संभाजी महाराज पकडले गेले. तटाच्या बाहेरच्या शत्रूंपेक्षा तटाच्या आतील फितूर घातक असतात. या नऊ वर्षाच्या काळात संभाजी महाराजांनी १३९ लढाया त्यापैकी एकही लढाईत त्यांच्या पराभव झाला नाही.
पकडले गेल्यापासून संभाजी महाराजांना अतिक्रूर, पाशवी आणि इस्लामी पद्धतीने छळले जात होते . रोज त्यांच्या शरीराची साल सोलली जात होती. मरण आणि मरणांतिक यातना दिल्या जात होत्या. या सर्व यातनांतून सुटण्यासाठी औरंगजेबाने संभाजी महाराजांना आमिष दाखवले कि तू हिंदू धर्माचा त्याग कर आणि इस्लाम चा स्वीकार कर, तुझी सुटका होईल , सरदारकी मिळेल , तुझे स्वराज्य परत मिळेल, सत्ता मिळेल , संपत्ती मिळेल फक्त मुसलमानी धर्म स्वीकार. फक्त एकाच क्षण म्हणायचा अवकाश कि , होय मी शरण आहे , नतमस्तक ..मला इस्लाम कबूल आहे ! पण नाही .... एकही क्षण न घालवता संभाजी महाराजांनी हे अमिश लाथाडले , त्यावर थुंकले आणि मरण पत्करलं. परिणामी रोज त्यांचा देहाचा एकेक अवयव तोडून शेवटी शिरच्छेद करण्याचे फर्मान औरंग्याने सोडले. फाल्गुन आमावश्याला, वढू बु. येथे त्यांच्या देहाचे पायकडून डोक्यापर्यंत कुऱ्हाडीने तुकडे तुकडे करून मारण्यात आले.
संभाजी महाराजांचे बलिदान हे निश्चित हिंदू धर्मासाठी आणि देशासाठी होत, त्यावेळी शंभूराजे देशातील एकमेव हिंदू छत्रपती सिंहासनाधिश्वर महाराज होते . "जसा राजा तशी प्रजा ", या न्यायाने जर या राजाने मुसलमान धर्म स्वीकारला असता तर या देशातील हिंदू प्रजेने भयापोटी, भीतीपोटी मुसलमान धर्म स्वीकारला असता , सर्व हिंदू धर्मच नाहीसा झाला असता पण त्यांच्या अभूतपूर्व बलिदानामुळे हिंदुधर्म आणि हिंदुस्थान टिकला. संभाजी महाराज बलिदान झाले. पण त्यांचे बलिदान एका क्षणात , एका निमिषात किंवा एका घटकेत झाले नव्हते तर पकडले गेलेल्या दिवसापासून फाल्गुन अमावाश्येला बलिदान झालेल्या दिवसापर्यंत ते रोजच मरणांतिक यातना भोगत होते . म्हणूनच श्रीशिवप्रतिष्टान हिंदुस्थान दर वर्षी संपूर्ण फाल्गुन महिना !! धर्मवीर संभाजी महाराज बलिदानास मास !! दुःखाचा, शोकाचा म्हणून पाळतो. महाराष्ट्रातील असंख्य गावोगावी, शहरात, तालुक्यात, त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्लोक म्हणून संपूर्ण महिनाभर श्रद्धांजली अर्पण केली जाते.
संभाजी महाराजांना झालेल्या मरणांतिक यातनांची प्रत्यक्ष जाण आपल्याला यावी व त्याची जाणीव व्हावी यासाठी अनेक धारकरी सम्पूर्ण महिनाभर एक वेळ जेऊन उपवास करतात, तर कोणी पादत्राणे घालायची सोडतात, तर कोणी गोड पदार्थ खाण्याचे टाळतात, तर कोणी दूरदर्शन पाहणे , गादीवर झोपणे टाळतात.