top of page

लोकजागरण भाग 2

मनीं एक हेतु मुखीं अन्य वाचा ।

स्वभावें जनांचा असा नीच ढाचा ।।

सबाह्यांतरीं जान्हवी शुद्ध जाणा ।

तसें शुद्ध जगता उरी देवराणा ।।१।।

( जान्हवी -गंगा )

 

अति झोपती शत्रू जाणा स्वत:चे ।

खरें पाहतां शत्रूं तें मायभूचे ।।

जयाना सुचेना हिताचा विचार ।

तयांच्या हुनी अश्महि फार थोर ।।२।।

( अश्म-दगड )

 

मनें तोडी तो शब्द जाणा कठोर ।

असंख्यास जोडे असें जो मधूर ।।

अहर्निश ठेवूं मनीं एक सार ।

जगीं शब्द आहे दुधारी हत्यार ।।३।।

 

आतां चालणें चालणें हाच मार्ग ।

आम्हां वाटतो मायभू हाची स्वर्ग ।।

कधीं ना कशाची आम्ही आस केली ।

हृदीं आमुच्या राष्ट्रनिष्ठा उदेली ।।४।।

 

नको मान सन्मान आम्हांस कांहीं ।

जगूं मायभूच्यास्तवें हीच ग्वाही ।।

त्वरें निर्मूं निष्ठा प्रति हिन्दुदेहीं ।

करूं राष्ट्रसेवा बनोनी विदेही ।।५।।

 

गुरूं शोधतां शोधतां ऊर फाटे ।

मनासारखा अन्य आहे ना कोठें ।।

मनाचे तळीं ठाण मांडून राहूं ।

भवाचा निधी पार लंघून जाऊं ।।६।।

 

जरी बेंदरी बैल भूभूषवीले ।

झुली घालूनी खूप श्रृंगार केले ।।

पुरेसें मिळेना तया अन्न खाया ।

वृथा सर्व श्रृंगार जातील वाया ।।७।।

 

 जळीं मंथुनी ना मिळे लोणी केंव्हा ।

विना छिद्र वेळू कसा होई पावा? ।।

असे वांझ महिला कसें मूल व्हावें? ।

नसे चित्तशुद्धी कसा देव पावे? ।।८।।

 

 

कधीं ना कधीं देव देईल भेटी ।

तपानें धरावें स्वत:लाच वेठी ।।

हरि अन्य नाही स्वत:हून जाणा ।

वसे सद्गुणांच्यारूपें देवराणा ।।९।।

 

समुद्रामधे थेंब नाही मधाचा ।

वृकाचे उरीं अंश कैसा दयेचा? ।।

कसाई कसासें विना काळजाचा? ।

कृतघ्नता धर्म उपकृतांचा ।।१०।।

( वृक - लांडगा )

 

विना कर्म करिता वृथा काळ जाणें ।

स्वत:चा स्वत:नें असें खून करणें ।।

जगीं सर्व कांही मिळें हाटी जाता ।

खरेदी मिळे ना कुठें आयु घेतां ।।११।।

( हाटी - बाजार )

 

नसे आत्मविश्वास ज्याचा स्वत:ला ।

उणा राहतो तो जगीं करतुतीला ।।

हरि आत्मविश्वास देतो मनाला ।

नका अंतरूं अंतरीच्या हरीला ।।१२।।

 

कधी लागते का रविला विजेरी? ।

कधी जान्हवी कां हुडके विहिरी? ।।

न लागे मृगेन्द्रा कुणी सोबतीला ।

चढा जाणूनीं हें त्वरें श्रेष्ठतेला ।।१३।।

( मृगेंद्र - सिंह )

 

मार्जार भासती खलु परी तें न व्याघ्र ।

गरूडापरी दिसतसें हर एक गृध्र ।।

बगळे वरूनी दिसती जणू काय हंस ।

दिसती मनुष्य वरूनी परी आंत कंस ।।१४।।

( गृध्र-गिधाड )

  

विना गूल काडी कशी पेट घेई? ।

कितीही बळानें कुणी घासली हि ।।

जयाचे उरीं आग नाही स्वत:ची ।

रवीचे परि काय उजळेल प्राची? ।।१५।।

( प्राची-पूर्व दिशा )

 

नका नीतीतत्वे लिहूं पुस्तकांत ।

त्वरें आचरूं या स्वयें जीवनांत ।।

नको धर्मचर्चा वृथा आयु जाई ।

आचारातुनी धर्म बलवान होई ।।१६।।

 

मनीं स्वार्थ ज्यांच्या पुरा ठासलेला ।

अशानीं जगाचा खरा नाश केला ।।

जगद्हित करिता नसे देहभान ।

असे सर्व तें सूर्य सरिते समान ।।१७।।

 

मनाहूनी नाही जगीं अन्य दुष्ट ।

करी मानवाला सदा मार्गभ्रष्ट ।।

जिहीं मित्र केला शमाला घनिष्ट ।

अशांचे जिणें होतसे सर्व श्रेष्ठ ।।१८।।

 

अहर्नीश ज्याना हरिभाव स्पर्शे ।

जगीं त्यांचियानें दयाधर्म वर्षे ।।

अशांच्या कुळ्या वाढता धर्म वाढे ।

तयांच्या मुळें जाहले देव वेडे ।।१९।।

 

दधीं मंथिता सापडे ताक लोणी ।

परि मूल्यता एक माने न कोणी ।।

बळिराम बंधु असे माधवाचा ।

गुणानें उणा राहिला नित्य साचा ।।२०।।

( दधीं-दही )

 

अरि नाश व्हावा असा ध्यास ज्यांना ।

रणीं देवता नित्य वरते तयांना ।।

करूं हिन्दु सारे अशा धारणेचे ।

पुढारी करूं राष्ट्र साऱ्या जगाचे ।।२१।।

 

 

विना मोल वस्तु कुठें ही मिळेना ।

विना कष्ट शेती कधीं ही पिके ना ।।

विनाभ्यास ज्ञानी कुणीं ही बने ना ।

विना भक्ति भक्ता हरि भेट दे ना ।।२२।।

 

जयांच्या मनीं भूक नाही गतीची ।

करा कीव त्यांच्या दरिद्री मतीची ।।

गतीहीन तें भूवरी भारभूत ।

तयाना म्हणावें कसें हो जिवंत ।।२३।।

 

पळीला चवी आमटीची कळे ना ।

तसा आंतरात्मा कुणा आकळे ना ।।

तया पाहण्या नेत्र नसती समर्थ ।

मति इंद्रियें सर्वथा तेथ व्यर्थ ।।२४।।

 

जरी फोडले चक्षु द्वी मांजराचे ।

तरी माग काढी सदा उंदरांचे ।।

कुणी वस्त्र नेसे जरी देही स्वच्छ ।

कशी वासना नाश पावे गलिच्छ? ।।२५।।

( चक्षु-डोळे )

 

सामर्थ्य देहीं वसते, असते पशुचे ।

दासानुदास बनते क्षणीं वासनेचे ।।

निष्ठा विवके जपतां नित मानसांत ।

सामर्थ्य दैवी बनते बघतां क्षणांत ।।२६।।

 

स्वत:च्या मुळाने जरी नीर घेई ।

तरी कोणता ही तरू पुष्ट होई ।।

कुळीं पुत्र जन्मे तरी वंश वाढे ।

कळे ना तयांना म्हणा शुद्ध वेडे ।।२७।।

( नीर-पाणी )

 

कुठें हि दिसो साप ठेचूनी मारा ।

मनीं अन्य चर्चेस द्यावा न थारा ।।

विषाचे विना कोणता सर्प आहे? ।

वरोनी कसें पाहुनी ओळखावें ।।२८।।

 

अहि चावतां प्राण जातो खचीत ।

तया देखतां मारणें हें उचीत ।।

तसें देशशत्रू टिचोनी वधावें ।

तरी राष्ट्रगाडा यथोचित धावें ।।२९।।

( अहि -साप)

 

अरि मारणें श्रेष्ठ कर्तव्य जाणा ।

कळे ना तया काळ हाणी वहाणा ।।

जयाना जगीं राष्ट्र वाटे टिकावें ।

तयानीं सदा कृष्णपंथेची जावें ।।३०।।

 

सुगंधा विना पुष्प ही त्याज्य वाटे ।

जयाना नसे शील ते हि करंटे ।।

नसे प्राण ती हि कुडी कूचकामी ।

नसे शील ज्याला मनु तो निकामी ।।३१।।

( कुडी -देह,शरीर )

 

कृतीच्या मुळाशीं असावा विचार ।

जसी शेष आहे वसुचा आधार ।।

कृती उक्तीचा मेळ ठेवूं नितांत ।

तरी धर्म नीती वसे या जगांत ।।३२।।

( वसु-पृथ्वी )

 

अधर्मा पुढें मान वाके न ज्यांची ।

तयांच्या पुढें मान झुकते जगाची ।।

महामोह स्पर्शू ज्यांना शके ना ।

'शिवाजी' तयांची असे जात जाणा ।।३३।।

 

दिला शब्द पाळूं जरी प्राण गेला ।

असे पुत्र व्हावे आतां मायभूला ।।

जगूं आई साठीं असा ध्यास ज्याना ।

उठा हाक मारूं अशा बांधवाना ।।३४।।

 

जयांच्या वरी देव आहे प्रसन्न ।

कुणी निंदिता तें न होती विषण्ण ।।

जयाना जगीं कार्य करणें महान ।

तयानीं जगावें बनोनी लहान ।।३५।।

 

 इतिहास अभ्यास वृत्ती न ज्यांची ।

अधोगति नित्य घडते तयांची ।।

असोनी बळें नेत्र झाकूनी चाले ।

जगीं राष्ट्र तें मृत्युपंथेची गेले ।।३६।।

 

नभीं सूर्य धावे तरी पद्म हासे ।।

इतिहास चित्तीं तरी राष्ट्र विकसे ।

जयाना जगीं राष्ट्र करणें महान ।

इतिहास व्हावा तयांची तहान ।।३७।।

( पद्म-कमळ )

 

उभे बंगले चांगलें थाट माट ।

मधे राहती लोक ही धष्ट पुष्ट ।।

स्वत: मी धनी सांगती मी बंगल्याचा ।

यमाला नसे मान्य ही फोल वाचा ।।३८।।

 

जरी औषधानें घडे रोगनाश ।

टळे ना कशानीं इहीं मृत्युपाश ।।

आटाचटाळू कुणी घेई शाल ।

तरी शोधुनी मृत्यु त्याला वधेल ।।३९।।

(आटाचटाळू - टाचे पासून टाळु पर्यन्त )

 

जयांच्या बुडाशीं असे अर्थसत्ता ।

तया लाभते मान आणि महत्ता ।।

गुणाला नसे मोल कांही जगांत ।

धनाढ्यास देवाहुनी मानतात ।।४०।।

 

धनाधीश त्या भोवती लोक गोळा ।

अभिलाष चित्तीं वरोनीं जिव्हाळा ।।

बकध्यान चाले गिळायास मीन ।

त्रिमुर्ती जसें भोवती चार श्वान ।।४१।।

( मीन-मासा )

 

कुठें देव आहे कुणाला पुसावें? ।

कुणाला नसे नांव ना गांव ठावें ।।

तरूंच्या मुळ्या नीर शोधीत जाती ।

तशी तीव्र इच्छा तरी देवप्राप्ती ।।४२।।

( नीर-पाणी )

 

ढगांची दळे अंबरीं धावतात ।

बहू गर्जती थोडके वर्षतात ।।

किती जन्मती माणसे या जगांत ।

क्वचित थोडकी जाणती सांख्य शास्त्र ।।४३।।

( दळे-समुह,अंबरी -आकाश )

 

केले जरी कलप लावूनी केस काळे ।

तारूण्य त्यातुनी कधीं तरी कां उफाळें? ।।

फसवून काय जगतास आणि स्वत:स ।

लाभेल कां कधीं कुणा गत यौवनांश? ।।४४।।

 

 

जरी दोष ध्यानीं आले आणिकांचे ।

उच्चारणें योग्य न होई वाचे ।।

तया अंतरीं पेरूं या ध्येयतेला ।

आपोआप ते पोहचती योग्यतेला ।।४५।।

 

धरित्री कधीं रागवे कां कुणाला? ।

सहनशीलतां तीहुनी ना कुणाला ।।

जयाना जगीं कार्य करणें महान ।

तयानीं जगावें धरित्री समान ।।४६।।

 

विळा भोपळा भेटती एकमेका ।

विळ्याला नसे भेटीनें कांही धोका ।।

विळ्यानें बने भोपळाहि विदीर्ण ।

कळे हें न त्याना म्हणा लंबकर्ण ।।४७।।

( लंबकर्ण-गाढव )

 

स्वार्था विना मनीं नसे दुसरा विचार ।

तें क्षुद्र कां कधीं तरी बनती उदार ।।

मार्जार नेत्र मिटुनी बसती बिळाशीं ।

बगळ्या समान सगळे निजस्वार्थवासी ।।४८।।

 

पहावें तिथें दंभ बोकाळलासे ।

तयाचे मुळें धर्म ही भ्रष्टलासे ।।

जनांची घडे वंचना आणि भ्रांती ।

चहुबाजुनी कुंपणें शेत खाती ।।४९।।

  

 

झगडूं अभंग धृतीनें अरिच्या कुळ्यांशीं ।

चित्तांत ठेवूनी सदा शिवभूप साक्षी ।।

ठेचूनी हुडकुनी करूं शत्रु नाश ।

नि:शत्रु निर्भय करूं अवघा स्वदेश ।।५०।।

 

कशी वातीवाचूनि तेवेल ज्योती? ।

कशी मातीच्या वाचूनि होई शेती? ।।

विनाप्राण ना देह राहे जिवंत ।

विना धर्म ना राष्ट्र होई ज्वलंत।।५१।।

 

 

प्राशेल कांजी कुणी कां त्यजूनी पियूष ।

गांडुळ घेऊनी मही त्यजते न शेष ।।

त्यागून भास्कर कसें धरुं काजव्याला ।

हिन्दुत्व सोडुनी कसें भजूं षंडतेला ।।५२।।

संदेह स्वार्थ त्यजुनी करूं देशकार्य ।

हिन्दूंत निर्मू धृतीनें शिवभूपधैर्य ।।

सारा समाज घडवूं नरशार्दुलांचा ।

आधार होऊनी जगूं अवघ्या जगाचा ।।५३।।

 

दिसती जिवंत वरुनी मृतवत् मनानीं ।

बुद्धि असूनी जगती हतबल मतींनीं ।।

जाणिवशून्य पशुवत् जगीं हिन्दुलोक ।

वाटेल कां कधीं तरी गनिमास धाक?।।५४।।

 

उच्छिष्ट सेवूनी जगीं जगतात काक ।

तें क्षूद्र जीवन कुणा सहवेल सांग?  ।।

गरुडापरी जगुनिया नभीं घ्या भरारी ।

संस्थापण्या जगतीं धर्म बना मुरारी ।।५५।।

 

कार्या विना क्षण हि व्यर्थ कधीं न सांडू ।

निष्क्रीयता सहज अग्निमुखांत सोडू ।।

चित्तांत ध्यास आमुच्या नित मायभूचा ।

हा देश सत्वर करुं नरशार्दुलांचा ।।५६।।

 

राष्ट्रार्थ अर्पण करा अवघे आयुष्य ।

आम्हास सांगत उभे अतीतांत भीष्म ।।

जळतात ते उजळती आपुले भविष्य ।

कोरुनी ठेवूं नित हें उरीं वेदभाष्य ।।५७।।

 

पुरुषत्वहीन पुरुषास नसे अपत्य ।

वांझेस मूल नसते जगीं विश्वसत्य ।।

निष्ठाविहीन मृतवत् जरी लोक झाले ।

ते लोक राष्ट्र म्हणुनी कधीं ना उदेले ।।५८।।

 

विना भूक कां कोणी भक्षेल अन्न? ।

प्राशेल कां कुणी जला नसता तहान? ।।

नसता उरांत जळती निजदेशभक्ति ।

मात्र्यर्थ कोणी न झिजे सकला प्रचिती ।।५९।।

bottom of page