पथीं चालता वाट केंव्हा न पहावी ।
कुणा सोबतीची अपेक्षा नसावी ।।
खरा मित्र आहे नभीं धावतो तो ।
हृदीं अंतरात्मा बनोनी रहातो।।१।।
आम्हां ऐक देवा ! नको अन्य काही ।
कृपाछत्र राहो तुझें नित्य डोई ।।
हृदीं भक्ती देई तनीं कर्म शक्ती ।
आणि अंतरामाजीं आत्मप्रचिती ।।२।।
आम्हा अंतरात्मा हाकारूनी सांगे ।
उठा मार्ग चाला नकां पाहू मागें ।।
उभा पाठिशीं श्रीहरि संकटांत ।
असे वज्रनिर्धार ज्यांच्या उरांत ।।३।।
जिथें देव नाहीं असें स्थान सांगा ।
हिमाद्री कसासें विना मायगंगा ।।
पुढें पाठीमागें वरीं खालीं नित्य ।
तया वाचूनी विश्वीं काहीं न सत्य ।।४।।
जिथें क्षारभूमी नका बीज पेरूं ।
बसायास घेऊं नका अंध वारू ।।
नसें चित्त थार्ऱ्यावरी श्रोतयांचे ।
वृथा कष्ट घेऊ नकां बोलण्याचे ।।५।।
पशू माणसाच्यामधें काय भेद ? ।
तयासाठीं केंव्हा करावा न वाद ।।
नसें पुच्छ मनुजा कमी दोन पाद ।
उभयतांमधें अन्य काहीं न भेद ।।६।।
नका तुच्छ लेखूं अहिच्या बळाला ।
सदा निरखावें तयाच्या गतीला। ।
नका संधी सोडूं तया ठेचण्याची ।
असें वाट ही राष्ट्र राखावयाची ।।७।।
विचारीं मनाला तनु ही कशांला?।
दिली विठ्ठलें का उगा नासण्याला ? ।।
जगीं चंदनानी वृथा कां कुजावें?।
झिजोनी जगाला सुगंधास द्यावें ।।८।।
आम्ही ध्येयमार्गी कसें थांबू कोठें?।
पथीं थांबती चालतां ते करंटे ।।
कधीं जान्हवी थांबली वाहताना? ।
तसा भानू सांगा नभीं धावताना ।।९।।
अहि कां कधीं स्पर्शतो मुंगुसाला?।
तसां मोह जाणा आम्हां जीवनाला ।।
तमानें कधीं कां रवि ग्रासियेला? ।
शमाच्या पुढें मोह निष्प्राण झाला ।।१०।।
जळावीन मासा नसें जीवमान ।
तसें आम्हीं मातेविनां प्राणहीन ।।
असो जागृतीं स्वप्नीं हि वा सुषुप्तीं ।
अहोरात्र हा मायभू ध्यास चित्तीं ।।११।।
उरीं ध्येयज्वाला असें पेटलेली ।
अशाना करीं लागती ना मशाली ।।
रवी नित्य तेवें विना तेलवात ।
अशांची 'शिवाजी' असें जन्मजात ।।१२।।
नका रंग पाहूं बघा अंतरंग ।
बकाचे असे ध्यान हें शुद्ध ढोंग ।।
जरी कस्तुरीचें असे रूप काळे ।
परी अंतरीं सौरभाचे उमाळे ।।१३।।
जया अंगीं शक्ती तया मान सत्ता।
जगीं शक्तीहीना कटीं नित्य लत्ता ।।
पहा भेकरें भक्ष्य झाली वृकांची ।
सदा भोगतो सिंह सत्ता वनाची ।।१४।।
( वृक-लांडगा )
वृथा कां करा खंत गेल्या आयुची? ।
करा काळजी राहिल्या जीवनाची ।।
जसा बाण मागें फिरोनि न येई ।
असें जाणूनिया करू कर्मघाई ।।१५।।
मनाच्या मुळाशीं खरा सर्व गुंता ।
कळेना भल्या बुद्धिच्याहि महंता ।।
नभाची किती उंची तें आकळेना ।
मनाला किती सुरकुत्या तें कळेना ।।१६।।
मना सारखां शत्रू नाही कुणी हि ।
सदा वास ज्याचा असे मर्त्य देहीं ।।
पराभूत त्याला करावें तपानें ।
असें सांगतो धर्म मोठ्या रवानें ।।१७।।
नदीला कुठें थांबणें मान्य नाही ।
रवीला कधीं झोपता येत नाही ।।
जगाच्यास्तवें जन्म झाला जयांचा ।
तयाना नसे खास विश्राम साचा ।। १८।।
नकां धीर सोडूं विपत्तीत केंव्हा ।
स्मरां सिंहवृत्ती मना माजी तेंव्हा ।।
जरी घेरलां तो तरी झुंज घेई ।
समस्तासी मारोनी जिंकोनी जाई ।।१९।।
समुद्रामधें जो प्रवासा निघाला ।
कसा निंदीतो तो तया क्षारतेला?।।
विना जीन घोड्यावरी बैसणार ।
तयाच्या बुडाला कणा टोचणार ।।२०।।
कुठें देव आहे कुणां नाही ठावा ।
कळेना स्वत:ला कसा शोध घ्यावा ।।
दुधज्ञान जैसें नसे गोचिडाना ।
हरिज्ञान तैसें नसे मानवाना ।।२१।।
महामंत्र आहे नव्हे शब्द साधा ।
जयाच्या स्मृतीनें जळे म्लेंच्छबाधा ।।
नुरे देश अवघा जयाचे अभावी ।
'शिवाजी' जपूं राष्ट्रमंत्र प्रभावी ।।२२।।
त्वरेनें चला गाठूं या ध्येयधाम ।
तयावाचुनी घेवूयां ना विराम ।।
स्मृती अंतरीं ठेवुयां पूर्वजांची ।
स्मरू कृष्ण आणि मनीं सव्यासाची ।।२३।।
( सव्यासाची- अर्जुनाची )
समुद्रास तीव्रा पिपासा जळाची ।
तशी आमुच्या अंतरीं माणसांची ।।
मधुमक्षिका आणि भुंग्या समान ।
जगूं या तसें राष्ट्र करण्या महान ।।२४।।
जगीं पूर्ण एकांत कोठे असावा? ।
असा शोध घेता कुणी ही फसावा ।।
जधीं वासनावादळें होती शांत ।
नसे तो कुठें हि असे अंतरांत ।।२५।।
जया ना तहान जया भूक नाही ।
असा प्राणी सांगा जगीं या कुणीही ।।
जया अंतरीं तेवते मातृभक्ति ।
तया आडवे कां कशाची आसक्ती ।।२६।।
कुणापाशीहि याचना कां करावी? ।
स्वत:ची स्वयें वंचना थांबवावी ।।
दिलें सर्व राहत्या हृदीं श्रीहरीनें ।।
तयाला करूं अर्थना तीव्रतेनें ।।२७।।
जगाला नको शिस्त लावा स्वत:ला ।
नका ज्ञान सांगू कधीं हि कुणाला ।।
सुधारा स्वत:ला धरा पुण्य मार्ग ।
अशानें धरेच्या वरीं येई स्वर्ग ।।२८।।
जगा दूध पाजा परि ना अहिला ।
सदा सत्य बोला परि ना खलाला ।।
जगीं सर्व प्राण्यांमधे आत्मतत्व ।
अहिशत्रूचे रक्षिणें ना जिवित्व ।।२९।।
बळाच्या विना सत्य नष्टांश थोटें ।
बळाच्यामुळें अनृता स्थान मोठें ।।
बनाया जगीं हिन्दु संज्ञा यथार्थ ।
उठूं या करूं हिन्दुराष्ट्रा समर्थ ।।३०।।
( अनृता-असत्य )
कृती उक्तीचा थेट संबंध ठेवा ।
सुई मागूती सूत्र जैसा रिघावा ।।
जसे आम्ही बोलूं तसे नित्य चालूं ।
तरी लीलया धर्मकार्यास पेलूं ।।३१।।
नभा खालतीं सर्वच्या सर्व ठेंगू ।
कृतांता पुढें मानवी बुद्धी पंगू ।।
करूं मात मृत्यूवरी कर्मयोगें ।
भवाचा निधी लंघु या ज्ञानयोगें ।।३२।।
नसे भाव पोटीं वृथा शब्द ओठीं ।
कशाला जगा सांगता ज्ञानगोष्टी ।।
मनीं कोरडे ते पुरे दंभबाज ।
असे शील त्याला नको स्वर्णसाज ।।३३।।
कधीं ना जलाचें नद्या मूल्य घेती ।
द्युती चंद्रभानू विना शुल्क देती ।।
लता वृक्ष देती फुलाना फळाना ।
कसें हें कळेना जगीं मानवाना ! ।।३४।।
करे अल्पज्ञानी बहु बडबडाट ।
जसा निर्झरांचा अति खळखळाट ।।
असे पूर्णज्ञानी कमी बोलणारा ।
विना नाद वाहे जशी गंगधारा ।।३५।।
जरीं पेटलें विश्व हें वासनेनें ।
आम्ही मार्ग चालू अति संयमानें ।।
जगीं पद्मपत्रास चिकटे न पाणी ।
जळे ना कधीं स्वर्ण उजळे आगीनीं ।।३६।।
रणीं देश रक्षावया झुंज देऊं ।
करीं धर्मसंस्थापण्या शस्त्र घेऊं ।।
अरींच्या कुळ्या जाळुनिया अशेष ।
जगाचा पिता हा करूं हिंन्दुदेश ।।३७।।
दिलें जे हरिनें अति तातडीनें ।
चला अर्पुया मायभूला मनानें ।।
तनानें धनानें तसे जाणिवेनें ।
उभारूं चला हिंदुराष्ट्रा गतीनें ।।३८।।
पायातलें दगड ना कधीं दृष्यमान ।
कळसाहुनी न च कुणा अति उच्चस्थान ।।
हें राष्ट्रमंदिर चला उभवूं गतीनें ।
मात्र्यर्थ त्याग करूनी विरूं या धृतीनें ।।३९।।
( मात्र्यर्थ-आई साठी )
विवेका विना पाय पुढती न टाका ।
असा जीवनाचा धरा नित्य ठेका ।।
विकारामुळें दृष्टी ज्यांची न अंध ।
अशांशी धरावा जनीं स्नेहबंध ।।४०।।
नदी सागराचे मुला माऊलीचे ।
तसें आत्मनाते आम्हा मायभूचे ।।
शशीअमृताची चकोरास भूक ।
आम्हां मातृभक्ती असें वेड एक ।।४१।।
पुढें टाकला पाय मागें न घेऊं ।
दिला एकदां शब्द केंव्हां न फिरवूं ।।
ध्वजा घेतली ती कधीं हि न सोडू ।
आम्ही मायभूचे रणीं पांग फेडू ।।४२।।
रणीं जिंकणे शत्रूला फार सोपे ।
मनाच्या पुढें पालथे सर्व बापे ।।
बनूं स्वामी जेंव्हां स्वत:च्या मनाचे ।
उजाळूं शकूं भाग्य अवघ्या जगाचे ।।४३।।
उजाळावया नित्य लागे जळावें ।
विना गाडतां बीज का अंकुरावें? ।।
अतीतातूनी कांही आम्ही शिकावें ।
झिजोनी स्वयें राष्ट्र हें उद्धरावें ।।४४।।
( अतीतातूनी-भुतकाळातूनी )
अरि मारणें आद्य कर्तव्य जाणा ।
कळेना तया काळ हाणी वाहाणा ।।
जयाना जगीं राष्ट्र वाटें टिकावे ।
तयानीं सदा कृष्णपंथेची जावें ।।४५।।
कशासाठीं वेलीतरुफूल घ्यावें ।
स्वत: जीवनाच्या फुलानीं पुजावें ।।
असंख्यात पुष्पें हवी पूजनाला ।
म्हणा अर्पिला देह हा मायभूला ।।४६।।
अति कष्ट झालें तरी ना त्यजावें ।
करीं घेतले कार्य सिद्धीस न्यावें ।।
मनीं संकटाची क्षिती ना धरावी ।
उरीं तेवती ध्येयनिष्ठा असावी ।।४७।।
कुठें जायचे तें जया नाही ठावे ।
प्रवासास त्यानें कशाला निघावें? ।।
इथें राहुनी काय करणें?न ठावें ।
अशानीं जगीं जन्मुनी कां जगावें? ।।४८।।
कधीं वासनेचे नका होऊ दास ।
रहा संयमानें मनस्वी उदास ।।
जगीं जें कुणी वासनादास झालें ।
तयांचे जिणें श्वानवत् हीन झालें ।।४९।।
इतिहास वाचा मिळे दिव्य दृष्टी ।
ना वाचतां राष्ट्र हे दु:खी कष्टी ।।
जशी दिव्य दृष्टी मिळे संजयाला ।
तशी दृष्टी लाभो उभ्या भारताला ।।५०।।
नभासारिखें चित्त देई विशाल ।
तसें जान्हवी सारखें शुद्ध शील ।।
रवि सारखी बुद्धी तेजस्वी देई ।
प्रभु ! मागणें अन्य तें कांही नाही ॥
आई ! मागणें अन्य तें कांही नाही।।५१।।