धारातिर्थयात्रा (मोहीम)
हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळून उणीपुरी सत्तर वर्षे उलटून गेली. तरीपण हिंदुसमाज मानाने पूर्णतः पारतंत्र्यच आहे. कर्तृत्ववान, शीलवान, धैर्यवान, साहसी, त्यागी, संयमी, प्रखर देशाभिमानी आणि स्वाभिमानी उगवत्या तरुणांची पिढी हि राष्ट्राची खरी मूलभूत संपत्ती आहे. या कसोटीवर हिंदू समाज आजही दरिद्रीच आहे. सध्याच्या अधःपतित अवस्थेतून उगवत्या तरुण पिढीला ध्येयवादी बनविण्यासाठी छत्रपती श्रीशिवप्रभूंच्या अत्यंत स्फुर्तीप्रेरणादायक जीवनाचा न पुसला जाणारा खोल ठसा त्यांच्या चित्तात उमटविणे अत्यंत आवश्यक आहे. श्रीशिवछत्रपतींच्या वृत्तीची अवघी तरुण पिढी हि राष्ट्राची क्रमांक एकची गरज आहे. याचसाठी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान तर्फे प्रतिवर्ष शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या व अनेक हुतात्म्यांच्या व स्वतंत्रविरांच्या बलिदानाने धारातीर्थ बनलेल्या, गडकोट दुर्गांच्या मोहीम आयोजित केल्या जातात.
शिवछत्रपती संभाजी महाराज व अनेक नरवीरांचे जीवन आपल्याला वाचुन, ऐकून व त्यावरील माहितीपट पाहून कळेल पण ते समजायचे असेल, प्रत्यक्ष जाणून घ्यायचे असेल व उमजायचे असेल तर शिवछत्रपती आणि त्यांचे असंख्य मावळे जसे जगले तसा जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मोहीम हा अनेक नरवीरांसारखा जगण्याचा, राहण्याचा केलेला एक अल्पसा प्रयत्न आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि त्यांचे असंख्य मावळे काळाच्या ओघात निघून गेले. पण आजही हे सर्वजण कोणत्याही रूपात अस्तित्वात असतील तर ते म्हणजे हे दुर्ग. हिंदुधर्मशास्त्रा प्रेमानी कोणताही 'देह' हा नश्वर आहे पण त्यातील आत्मा हा अमर आहे. श्रीशिवाजी महाराजसुद्धा नाशिवंत देह टाकून गेले. पण त्यांचा आत्मा अमर आहे. त्यांच्या जगण्याचा आत्मा म्हणजेच सह्याद्री, त्यांच्या जीवनाचा आत्मा म्हणजेच हे गडकोट दुर्ग आजही अस्तित्वात आहेत. जसे श्रीराम म्हणजे धनुष्यबाण, श्रीकृष्ण म्हणजी सुदर्शनचक्र दिसते आणि हनुमान म्हणाले कि गदा तद्वत शिवाजी महाराज असे उच्चारले कि गड, दुर्गच समोर दिसतात. प्रत्येक दुर्ग म्हणजे शिवाजी विद्यापीठ आहेत. या दुर्गरूपी शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी, त्यांचा आशिर्वाद घेऊन त्यांच्या सारखेच प्रखर व कणखर आयुष्य जगणे शिकण्यासाठीच या मोहिमा सह्याद्रीच्या रांगांमधून व गडांवर आयोजित केलेल्या असतात. इथली धूळ मस्तकी लावणाऱ्या व्यक्तींमध्ये देशद्रोह्यांना धूळ चारण्याची ताकत निर्माण होते यात संशय नाही.
स्वतः शिवाजीमहाराज म्हणजेच एक उत्तुंग, उदंड, आणि अजिंक्य दुर्गाच होते. प्रत्येक गड, प्रत्येक दुर्ग म्हणजेच शिवछत्रपतींच्या गुणवैशिष्ट्यांचीच रूपं आहेत. तो प्रतापगड म्हणजेच त्यांच्या पराक्रमाचे रूप आहे. पुरंदरगड म्हणजे त्यांच्या धैर्याचे रूप आहे. सज्जनगड म्हणजे त्यांच्या भक्तीचं, श्रद्धेचं रूप आहे. सिंहगड म्हणजे त्यांच्या मायेचं रूप आहे. राजगड म्हणजे त्यांच्या उत्तुंगतेचं रूप आहे. रायगड म्हणजे त्यांच्या अजिंक्यतेचं रूप आहे. सिंधुदुर्ग म्हणजेच त्यांच्या कल्पकतेच रूप आहे. त्यांचा चरणस्पर्श झालेल्या अनेक दुर्गांवर म्हणजेच शिवछत्रपतींच्या पायाशी जाऊन त्यांचे जीवन जाणून घेण्यासाठी त्यांच्या या दुर्गरूपाशी एकरूप होण्यासाठी प्रतिवर्षी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान धारातीर्थयात्रांचे म्हणजेच मोहिमेचे आयोजन करते.
मृतवत अंतःकरणाची हिंदू समाजातील तरुण पिढी ध्येयवादी बनविण्याचा मोहीम हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. यातून उध्वस्त हिंदुसमाजाचा संसार दुरुस्त करणारी अदम्य इचछाशक्तीची व उत्तुंग आकांक्षेची प्रखर देशभक्त, धर्मभक्त व स्वातंत्र्यभक्त तरुण पिढी घडावी हेच या मोहिमेचे एकमेव लक्ष्य आहे.