।। ज्यांची दृष्टी कधी न कष्टी ।।
ज्यांची दृष्टी कधी न कष्टी निर्भयतेची करिते वृष्टी ।
मानत ज्यांच्या नित्य तरंगे भवितव्याची सुंदर सृष्टी ।।
क्षितिजे अभिनव गाठायाते पडते ज्यांचे पुढती पाऊल।
असे बनू या निश्चय करुनि परिस्थितीची घेऊनि चाहूल ।।
माणुसकीचे घडता दर्शन उदात्ततेचे करू या वर्तन ।
सर्प कालिया ग्रासू बघता फणेवरी करू तांडव नर्तन ।।
ज्या दृष्टीतूनि सौजन्याचे मधुर चांदणे नित्य पडावे
तीच दृष्टी दुष्टावर वळता भये तयाने दूर पळावे ।।
ममतेने जो हात फिरावा पददलितांच्या पाठीवरती ।
पशुता दिसता तोच हात क्षणी दृढ वज्राची व्हावी मुष्टी ।।
शांत मनाने टीका निंदा स्वकीय म्हणुनी घेतो ऐकुनी ।
परक्यांची परी उणे बोलता ज्वालामुखी जणू उसळू भडकूनी ।।
हीच आमुची होती नीती अनुसरताही पुढती रीती ।
कोण शके मग रोधायाला अप्रतिहत हि आमुची प्रगती ।।
प्रभुत्व साऱ्या पृथ्वीवरती या देशाचे माणुसकीचे ।
स्थापित व्हावे ह्या इर्षेने पाऊल पुढती टाकायचे ।।
झाला निश्चय झाला निश्चय जीवन सारे या ध्येयास्तव ।
अतिबलशाली अखंड भारत स्वप्न सुमंगल करू हे वास्तव ।।
झाला निश्चय कठोर निश्चय लक्ष लक्ष नवं हृदयांमधुनी
पराक्रमाने प्रिय भगवा ध्वज अखंड ठेऊ डोलत गगनी ।।