|| मर्दाची तुटली बघा रं ढाल ||
मर्दाची तुटली बघा रं ढाल, रक्तानं शरीर झालं लाल ।
हाताला गुंडाळितो शाल, झेलितो वार, वार बघा तलवार ।।
किल्ला हा कोंढाणा श्रेष्ठ , रक्षक उदयभान दुष्ट ।
करतो अबलांना भ्रष्ट , तयाला कारवाया नष्ट ।
निघाला तान्हा हा झुंझार, झेलितो वार, वार बघा तलवार ।।१।।
मर्दाची तुटली बघा रं ढाल, रक्तानं शरीर झालं लाल ।
हाताला गुंडाळितो शाल, झेलितो वार, वार बघा तलवार ।।
मराठे मोगलांस भिडले, कैक ते धाडशीर उडाले ।
कैक ते धरणीवर पडले, कैक ते दबा धरून बसले ।
गातो थोडासा आधार, झेलितो वार, वार बघा तलवार ।।२।।
मर्दाची तुटली बघा रं ढाल, रक्तानं शरीर झालं लाल ।
हाताला गुंडाळितो शाल, झेलितो वार, वार बघा तलवार ।।
बघा त्या कोंढाण्यावरती, रक्तानं लाल झाली माती ।
मराठे मागे ना फिरती, वर्णू मी काय त्यांची कीर्ती ।
निवडी मामा हा शेलार, झेलितो वार, वार बघा तलवार ।।३।।
मर्दाची तुटली बघा रं ढाल, रक्तानं शरीर झालं लाल ।
हाताला गुंडाळितो शाल, झेलितो वार, वार बघा तलवार ।।
शिवबा म्हणे सिंह गेला, अवघा महाराष्ट्र रडला ।
झेंडा किल्ल्यावरती चढला, शाहिरी डफ डफडफला ।
तुकड्या पुढे हेच गाणार, झेलितो वार, वार बघा तलवार ।।४।।