top of page

छत्रपति श्रीशिवाजी महाराजांची आरती

 

जयदेव जयदेव जय जय शिवराया

या या अनन्यशरणा आर्यां ताराया ।।ध्रु।।

 

आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला

आला आला सावध हो शिवभूपाला !

सद्गदिता भुमाता दे तुज हांकेला

करूणारव भेदुनि तव हृदय न कां गेला ?।।१।।

 

श्रीजगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी

दशमुख मर्दुनि जी श्रीरघुवर संरक्षी

ती पूता भुमाता म्लेंच्छांहीं छळता

तुजविण तिज शिवराया कोण दुजा त्राता ?।।२।।

 

त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलों

परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालों

साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया

भगवन् भगवद्गीता सार्थ कराया  या ।।३।।

 

ऐकुनियां आर्यांचा धावा महिवरला

करूणोक्तें स्वर्गीं श्रीशिवनृप गहिंवरला

देशास्तव शिवनेरीं घेई देहाला

देशास्तव रायगडीं ठेवी देहाला ।।४।।

 

।। बोला तत्श्रीमत्षिवनृप की जय बोला ।।

 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

(सन १९०२ रोजी, फर्ग्युसन कॉलेजातील आर्यन संघात दर आठवड्याला

सर्व विद्यार्थ्यांनी  भोजनसंघात  म्हणण्यासाठी हि आरती सावरकरांनी रचली)

  • w-facebook
  • Twitter Clean
  • w-flickr
bottom of page