।। भ्रांत तुम्हा कां पडे ?।।
हिन्दु पुत्रांनो स्वताःला लेखिता कां बापूडे ?
भ्रांत तुम्हा कां पडे ?
वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे ।।ध्रु।।
हिन्दुभूमि वीर प्रसवा, वैभवाला पावली,
का आता खालावली ?
धन्यता द्याया कुशीला सिध्द व्हा ठाका खडे
भ्रांत तुम्हा कां पडे ।।१।।
पूर्वजांची थोरवी, लाभे कधी बोलून का ?
झिंगूनी डोलू नका,
लक्ष द्या चोहीकडे द्या काल वैशिष्ट्याकडे
भ्रांत तुम्हा कां पडे ।।२।।
श्रेष्ठता जन्मेच ये का जाती पंथाला त्यजा,
हिन्दुतेला या भजा
नेमका का भेद भासे साम्य सारे का दडे ?
भ्रांत तुम्हा कां पडे ।।३।।
एकनाथांची कशी आम्हांस होई विस्मृती ?,
जो दया मानी स्मृती
अंत्यज्याचे जो कडे पोर तान्हे शेंबडे
भ्रांत तुम्हा कां पडे ।।४।।
पोट जाळायास देव्हारे पुजारी माजवी,
संस्कृतीला लाजवी
चूड घ्या अन् पेटवा दुष्ट रूढींचे हे मढे
भ्रांत तुम्हा कां पडे ।।५।।
ईच्छिता स्वातंत्र्य द्या, स्वातंत्र्य ते अन्यासही,
का न कोणा आस ही ?
का गुलामाचे तुम्हा सुलतान होणे आवडे ?
भ्रांत तुम्हा कां पडे ।।६।।
कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला,
थांबला तो संपला
धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे
भ्रांत तुम्हा कां पडे ।।७।।