top of page
।। एक् मात्र चिंतन आतां ।।
एक मात्र चिंतन आतां, एकची विचार,
भाग्यपूर्ण होईल केंव्हा हिन्दूभूमि थोर,
दुखः दैन्य जाऊनी विलया, होऊ दे स्वतंत्र,
भाग्यपूर्ण आई ध्यानीं मनीं हाचि मंत्र ।।१।।
मेघ जेवी जीवन देई, अर्पूनी धरेला
जीवना समर्पूनी जाई तो परि लयाला
परार्थाय जीवन त्याचे तेवी हो मदीय
मातृभूमीसाठीं माझे सर्व काही होय ।।२।।
तुझे पवन पावन आई! तुझे पुण्य पाणी
तुझे निळे आकाश किती स्वच्छ रत्नखाणी
तुझे चंद्र तारे दिसती किती सुरम्य गोड
तुला नसे साऱ्या जगतीं खचित आई ! जोड ।।३।।
तुझ्या धुळीमाजीं वाटे लोळणे सुखाचे
जिथें पाय पावन फिरले राम जानकीचे
जिथें नामघोषें फिरले संत ते अनंत
तुझ्या धुळीमधला झालो कीट तरी पसंत ।।४।।
दिगंतात वृध्दिंगत मी कीर्ती तव करीन
तुझी मूर्ती मधुरा दिव्या अंतरीं धरीन
तुझे नाम संतत ओठीं गान गोड कंठी
तुझी भक्ति अतुला अचला साठवीन पाटीं ।।५।।
bottom of page